प्रा. डॉ. सुनील विभुते एक प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक आहेत. विविध वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके इत्यादीतून विज्ञान विषयावर ३००हून अधिक लेखांचे लेखन केले आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या दोन पुस्तकांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ व भारताच्या पहिल्या कम्प्युटरचे निर्माते, पद्मभूषण पुरस्कार प्राप्त आदरणीय डॉ. विजय भटकर यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांच्या एका पुस्तकाला प्रसिद्ध शास्त्रज्ञ व पद्मभूषण प्राप्त आदरणीय डॉ. जेष्ठराज जोशी यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांच्या ‘विस्मयकारी विज्ञानकथा’ या कथासंग्रहातील ‘निर्णय’ कथा इयत्ता १० वी मराठी विषयाच्या कुमारभारती पाठयपुस्तकात समाविष्ट केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एम. ए. भाग – १ च्या अभ्यासक्रमात लेखकाच्या ‘मिरॅकल’ या विज्ञानकथा संग्रहाचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेतील डेट्राईट शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या ‘निनाद’ या जागतिक दिवाळी अंकातर्फे सन २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या जागतिक कथा स्पर्धेत लेखकाच्या ‘ऑक्सिडीग्रेड’ या विज्ञानकथेला जागतिक उत्कृष्ट कथेचा पुरस्कार मिळाला आहे.
आकाशवाणी पुणे, सोलापूर, धाराशिव, कोल्हापूर केंद्रावरुन पर्यावरण, प्रदूषण व विविध वैज्ञानिक विषयावर १५० हून अधिक व्याख्यांनाचे प्रसारण झाले आहे. लेखकाचे ‘story museum sunil vibhute’ हे यु टयुब चॅनल असून त्याद्वारे विज्ञानातील मनोरंजक कथा व माहिती यांचे प्रसारण केले जाते. मराठी विज्ञान परिषद, मुंबई, मराठी साहित्य परिषद, पुणे, इंडियन फिजिक्स असोशिएशन, पुणे, साहित्य संस्कृती अकादमी पुणे, साहित्य विहार संस्था, नागपूर, कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय, नाशिक अशा विविध नामांकित संस्थांचे ४५ पुरस्कार लेखकाला मिळाले आहेत.